BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

Saturday, May 15, 2021

बुद्ध जन्म तारखेची जागतिक मान्यता






 

बुद्ध जन्म तारखेची जागतिक मान्यता

1) भगवान बुद्धाचा जन्म इ.स.पूर्व 563 ला झाला, या जन्म तारीखेचा शोध कसा लागला ?
2) बुद्ध जन्म तारखेसाठी कोणते ऐतिहासिक स्रोत उपलब्ध आहेत?
3) भगवान बुद्धाच्या जन्म तारखेसंदर्भात विविध जागतिक मान्यता कोणत्या आहेत?
चला , या बद्दल जाणून घेऊया .

महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध यांचा जन्म लुम्बीनी या ठिकाणी  इ.स. पूर्व 563 साली झाला. बुद्ध 80 वर्ष जगले. अर्थातच  भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण 80 वर्षानंतर *इ.स. पूर्व 483* साली झाले . हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परमपूज्य , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा ' भगवान बुद्ध व त्यांचा धम्म' या ग्रंथामध्ये याच तारखेचा उल्लेख केलेला आहे. जागतिक बौद्धांमध्ये विशेषतः स्थविरवादी बौद्ध देशांमध्ये इ.स. पूर्व 563 याच जन्म तारखेलाच मान्यता दिलेली आहे. याशिवाय , गूगल वा विकीपडियावर या  तारखेसोबत अर्थात इ.स.पूर्व 563, बुद्ध जन्माची दुसरी तारीख इ.स. पूर्व 480  दर्शविण्यात आली आहे. या दोन्ही तारखेचा उल्लेख विकिपीडियावर करण्यात आला आहे.( फोटो क्र.1 बघा)
युनेस्कोच्या ऑफिशियल वेब पेजवर बुद्ध जन्माची तारीख वरील दोन्ही तारखेपेक्षा वेगळी  इ.स. पूर्व 623 दर्शविण्यात आली आहे.( फोटो क्र.3 बघा) स्वतः लुम्बीनी , जिथे बुद्धाचा जन्म झाला , तेथील LDT अर्थत Lumbini Development Trust यांनीसुद्धा युनेस्को प्रमाणे इ.स. पूर्व 623  हीच तारीख स्वीकार केलेली आहे. खालील तक्त्यावरून तुम्हाला बुद्ध जन्माची विविध जागतिक मान्यता समजून येईल. (फोटो क्र.2 बघा )
अश्याप्रकारे बुद्ध जन्म संदर्भात विविध जागतिक मान्यता आहे. यामध्ये जी तारीख सर्वाधिक मान्यता प्राप्त  आहे ती तारीख म्हणजे इ.स. पूर्व 563 होय.या तारखेला काही ऐतिहासिक स्रोत सुद्धा उपलब्ध आहेत. या ठिकाणी आपण त्या सर्व ऐतिहासिक स्रोतांचा बारकाईने अभ्यास करून , इ.स. पूर्व 563 या तारखेचा शोध कसा लागला , हे जाणू घेण्याचा प्रयत्न करू.

1) महावंश या ग्रंथानुसार , अशोकाचा राज्यभिषेक भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतर 218 वर्षानंतर झाल्याचा उल्लेख आहे.
2) भारतीय ग्रंथानुसार , अशोकाने अगोदर राजगादी हस्तगत केली होती . व 4  वर्षांनंतर विधिवत आपला राज्यभिषेक केला होता.
3) वरील दोन्ही संदर्भानुसार , बुद्धाच्या महापरीनिर्वाणानंतर 214 वर्षांनी अशोकाने राजगादी हस्तगत केली होती, हे सिद्ध होते.( पुढे 4 वर्षांनंतर विधिवत राज्यभिषेक केला)
4) वंश साहित्यामध्ये , अशोकाचा पिता बिंदूसारने 28 वर्ष  आणि आजोबा चंद्रगुप्तमौर्य यांनी 24 वर्षे राज्य केल्याचा उल्लेख आहे.
5) 28 + 24 = 52 , अर्थात अशोकाच्या 'राजा' होण्याचा 52 वर्षांपूर्वी चंद्रगुप्तमौर्यचा राज्यभिषेक झाला होता.
6) सिकंदर अर्थात अलेक्झांडर यांच्या सोबत भारतात आलेल्या ग्रीक इतिहसकाराच्या आधारे , चंद्रगुप्तमौर्यचा राज्यभिषेक इ.स.पूर्व 321 मध्ये झाला होता.
7) मुद्दा क्र.1 ,2 व 5 चा अभ्यास केल्यास लक्षात येईल , बुद्धाचे महापरीनिर्वाण व चंद्रगुप्तमौर्यचा राज्यभिषेक यामध्ये 162 वर्षाचे अंतर आहे.( 214 - 52 = 162)
8) अर्थात , चंद्रगुप्तामोर्याचा राज्यभिषेक इ.स.पूर्व 321 मध्ये झाला असेल ( मुद्दा क्र.6नुसार), तर 162 वर्षापूर्वी म्हणजे इ.स.पूर्व 483 मध्ये भगवान बुद्धाचे महापरीनिर्वाण झाल्याचे सिद्ध होते.( 321 + 162 = 483 )
9) भगवान बुद्ध 80 वर्ष जगले , म्हणजेच इ.स.पूर्व  483 च्या 80 वर्षे अगोदर अर्थात( 483 +80=563 ) इ.स.पूर्व 563 मध्ये बुद्धाचा जन्म झाल्याचे सिद्ध होते.

सदरील 9 मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास करावा. ज्यांना ऐतिहासिक तारखांचा अभ्यास करणे कठीण वाटते , त्यांना लगेच समजणार नाही . पण व्यवस्थित समजून घेतले , चिंतन केले तर बुद्ध जन्म तारीख इ.स.पूर्व 563 चा शोध कसा लागला , हे लक्षात येईल. धन्यवाद
संकलन :- भन्ते धम्मानंद , औरंगाबाद
                बोधिराजा बुद्धिस्ट टुरिझम
               मोबा. 9511964256