BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

Tuesday, August 16, 2016

# डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनवर १२ मे, १९५६ रोजी केलेले भाषण #

" मला बुद्ध धम्म का आवडतो ?
 . .    मला दिलेल्या थोड्या वेळात मला दोन प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे.
पहिला प्रश्न : "मला बुद्ध धम्म का आवडतो ?" आणि
दुसरा प्रश्न : "वर्तमानस्थितीत तो जगाला कसा उपयोगी आहे ?"
"मला बुद्ध धम्म आवडतो, कारण त्यामध्ये इतर कुठल्याही धर्मात नाहीत अशी तीन तत्त्वे एकत्रितपणे शिकविण्यात आली आहेत. इतर सर्व धर्म हे ईश्वर आणि आत्मा आणि मृत्यूनंतरचे जीवन यामध्येच गुंतलेले आहेत. बुद्ध धम्म प्रज्ञेची (अंधश्रद्धा आणि दैववाद याऐवजी समजदारपणा किंवा ज्ञान) शिकवण देतो. तो करूणा (प्रेम) शिकवितो, तो समता शिकवितो. पृथ्वीवरील चांगल्या आणि सुखी जीवनासाठी मानवाला हेच आवश्यक असते. बुद्ध धम्माची ही तीन तत्त्वे मला प्रभावित करतात. ही तीन तत्त्वे सर्व जगाला प्रभावित करतील. ईश्वर आणि आत्मा हे समाजाचे संरक्षण करू शकत नाहीत."
     जगात आणि विशेषतः दक्षिणपूर्व आशियाला आकर्षित करू शकणारी तिसरी गोष्ट बुद्ध धम्मात आहे. जगावर कार्ल मार्क्स आणि साम्यवाद, ज्याचा तो निर्माता आहे, यांचा जोरदार हल्ला झाला आहे. हे अत्यंत गंभीर असे आव्हान आहे. मार्क्सवाद आणि साम्यवाद हे ऐहिक विषयांशी संबंधित आहेत. त्यांनी सर्व राष्ट्रांच्या धार्मिक संस्थांचा पाया खिळखिळा केला आहे. ऐहिक व्यवस्थेशी जुळलेले नसताना सुद्धा धार्मिक व्यवस्थेसाठी ही आज स्वाभाविक बाब आहे की, धार्मिक व्यवस्थेवरच लौकीक व्यवस्था अवलंबून असते, लौकीक व्यवस्था ही धर्माच्या आशेशिवाय अधिक काळ टिकू शकत नाही, ती किती दूर असली तरी.
      दक्षिणपूर्व आशियातील बौद्ध राष्ट्रे साम्यवादाकडे वळल्यामुळे मी फारच आश्चर्यचकीत झालो आहे. याचाच अर्थ ते बुद्ध धम्म काय आहे हे जाणत नाहीत असा होतो. बुद्ध धम्म हा मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांना पूर्णपणे उत्तर आहे असा मी दावा करतो.
     रशियन प्रकारचा साम्यवाद हा रक्तरंजित क्रांतीमुळेच घडून येऊ शकतो. बुद्धाने सांगितलेला साम्यवाद हा रक्तविहीन मानसिक क्रांतीने घडून येतो. ज्यांना साम्यवाद अंगिकारायचा आहे त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, भिक्खूसंघ ही साम्यवादी संघटना आहे. तेथे खाजगी संपत्तीला स्थान नाही. यामुळे हिंसा घडून आली नाही. मनातील बदलामुळे हे शक्य झाले आणि ही व्यवस्था २५०० वर्षे टिकून राहिली. त्या व्यवस्थेचा -हास झाला तरी ते विचार अजूनही जीवंत आहेत. रशियन साम्यवादाने या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे. त्यांना अजूनही दोन प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.
पहिला प्रश्न आहे  : साम्यवादी व्यवस्था ही नेहमीकरिता का आवश्यक आहे ? रशियन लोक कधीही करू शकले नसते असे कार्य त्यांनी केले आहे हे मान्य केले पाहिजे, परंतु जेव्हा हे कार्य घडून आले आहे तेव्हा लोकांनी बुद्धाने शिकविलेल्या प्रेमासह स्वातंत्र्य का उपभोगू नये ? दक्षिणपूर्व आशियातील राष्ट्रांनी रशियाच्या जाळ्यात उडी मारण्यापूर्वी काळजी घ्यावी. ते कधीही त्या जाळ्यातून बाहेर पडणार नाहीत. त्यांना बुद्धाने काय शिकविले याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बुद्धाच्या शिकवणीला त्यांनी राजकीय स्वरूप देणे आवश्यक आहे. दारिद्य्र आजही आहे आणि ते नेहमीसाठी राहिल. रशियामध्येही दारिद्य्र आहे. तथापि, दारिद्य्र मानवी स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे कारण होऊ शकत नाही.
       दुर्दैवाने बुद्धाची शिकवण ही योग्य प्रकारे समजून घेण्यात आली नाही, त्यांची शिकवण ही सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे मिश्रण होते, हे लोक पूर्णपणे विसरलेले आहेत. बुद्ध धम्म हा एक सामाजिक संदेश आहे याची जाणीव झाली की, त्याचे पुनरूज्जीवन हे चिरकाली ठरून बुद्ध धम्म हा प्रत्येक व्यक्तीसाठी आकर्षणाची बाब कां हे जग जाणायला लागेल.
                          (सही)
               ( भी. रा. आंबेडकर )

.२६ अलीपूर रोड,
नवी दिली
दिनांक १२ मे, १९५६

संग्राहक - भंते धम्मानंद