BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

Saturday, August 1, 2015

सामना ह्या मराठी चित्रपटाविषयी 
सामना' या चित्रपटाला चाळीस वर्षे होत असताना आजही तो ताजा वाटतो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या चित्रपटातील हिंदुराव धोंडे-पाटील या पात्रातून दिसणारी राजकीय- सत्ताधारी प्रवृत्ती आजही जागोजागी दिसतेच. आज दिसत नाहीत, ते 'मास्तर'. जागल्याचे काम करणारे 'मारुती कांबळे' आहेत, पण 'मारुती कांबळेचं काय झालं' हा प्रश्न ऐकू येत नाही..
राजकारण सर्वाना आवडते. राजकारणी, त्यांची लफडी-कुलंगडी, शह-काटशह, कलगी-तुरे हे सर्व सर्वाना वाचण्यास आवडते. सर्वाना राजकीय मते असतात. म्हणजे आम्हाला राजकारण आवडत नाही हे म्हणणे हेसुद्धा एक राजकीयच मत असते. याचे कारण माणूस स्वभावत: राजकारणी असतो. प्रत्येकाचे 'पॉलिटिक्स' वेगळे. ते तो खेळत/जगत असतो. घरात, दारात, कचेरीत. या राजकारणाने आज समाजाचे प्रत्येक क्षेत्र व्यापलेले आहे. ते टाळून आपण कुठे जाऊच शकत नाही. वास्तव असे असताना मराठी साहित्यात सत्तेच्या या खेळाचे कितपत प्रतििबब दिसते? उत्तरादाखल आपल्यासमोर येतात त्या अगदी मोजक्याच कादंबऱ्या. चित्रपट क्षेत्राचीही तीच अवस्था. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असे राजकीय चित्रपट मराठीत झाले आहेत. तशी राजकीय पात्रे अनेक चित्रपटांत दिसली. तमाशापटांतला अविभाज्य भाग असलेला लंपट-मग्रूर पाटील हाही राजकीय व्यवस्थेचाच प्रतिनिधी. परंतु ती सगळी राजकारणाची विद्रूपचित्रे होती. राजकीय व्यवस्थेचा तळ गाठणे हे त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. मराठीत पहिल्यांदा हे काम 'सामना'ने केले. यंदा या चित्रपटाला चाळीस वष्रे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा समजून घेणे आवश्यक आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आजही हा चित्रपट तितकाच ताजा वाटत आहे. वस्तुत: चाळीस वष्रे हा काही वाटतो तितका कमी काळ नाही. आजच्या तंत्रयुगात दोन-तीन वर्षांनी पिढीबदल होत असताना चाळीस वर्षांचा काळ तर जणू शतकाएवढा मोठा वाटतो. या काळात बदलही आमूलाग्र झाले. समाजाची घडी बदलली. बाजारपेठांचे नियम बदलले. त्याचा परिणाम सामाजिक नात्यांपासून कौटुंबिक संबंधांपर्यंत आणि नीतिमूल्यांपर्यंत सगळ्यावर झाला. अशा परिस्थितीत कलाकारांनी निळे कपडे घालून चित्रित केलेल्या काळ्या-पांढऱ्या रंगातील सामनाचे कालसुसंगत राहणे हे त्या चित्रपटाचे यश मानायचे की आपले सामाजिक अपयश हा खरा आजचा प्रश्न आहे.
सामना कालसुसंगत आहे असे म्हणताना तो ज्या काळातून आला तो काळ समजून घेणे गरजेचे आहे. हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदíशत झाला. महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन तेव्हा १५ वष्रे उलटली आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर राज्याच्या राजकीय नेतृत्वाचा आस पांढरपेशा वर्गाकडून ग्रामीण भागाकडे वळलेला आहे. याचे कारण येथील सहकाराची चळवळ. आणि त्याच वेळी ७२चा दुष्काळ, तेव्हाचा पीएल ४८० खाली अमेरिकेने पाठवलेला काळपट गहू, त्याबरोबर आलेले काँग्रेस गवत, रोहयोची कामे लोकांच्या अजूनही स्मरणात आहेत. तिकडे बिहार, गुजरातमध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे नवनिर्माण आंदोलन जोरात सुरू आहे आणि इकडे महाराष्ट्रातील शहरी बुद्धिजीवी वर्ग सोडला तर त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही. मधल्या काळात सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात नवे कारखाने, दूधडेअऱ्या, पोल्ट्रीफार्म उभे राहात होते. त्यातून एक नवी अर्थव्यवस्था जन्माला आली होती आणि तिची सूत्रे या नवकारखानदारांच्या हाती होती. ही खरे तर लोकशाहीच्या डगल्यातील नवसरंजामशाही व्यवस्थाच. सामना चित्रपटातील िहदुराव धोंडे-पाटील थंडीने कुडकुडणाऱ्या मास्तरांच्या अंगावर शाल टाकताना म्हणतात, 'ही थंडी आमच्या राज्यातली हाय मास्तर. आम्हाला नाही बाधणार.' हा या नवसामंतांचा उद्गार. ही भावना, ही व्यवस्था तशी भारतीय गावगाडय़ाच्या अंगवळणी पडलेली. वर आदिलशाही असो, निजामशाही असो वा लोकशाही, ती जोवर या गावगाडय़ाला खीळ घालीत नाही तोवर मान वर करूनही पाहायचे नाही ही येथील शतकानुशतकांची रीत. ती या नवसरंजामशाहीला पोषकच होती. परंतु त्याच वेळी मताचा अधिकार आणि हाती आलेला पसा यामुळे ग्रामीण भागातील आजवर दबल्या गेलेल्या जातसमूहांतही आता सत्ताकांक्षा निर्माण होत होती. तो संघर्ष एव्हाना ठिकठिकाणी रंगू लागला होता. दलितांवरील अत्याचार वाढले ते याच काळात. हातून सत्ता गेलेल्या पांढरपेशा वर्गाला हे सगळे बदल वृत्तपत्रांतून समजत होते आणि या नवसामंती व्यवस्थेने त्याच्या आधुनिक प्रेरणांवर चरे जात होते. सामना हे त्या चरचरीचे चित्र आहे. मास्तर हा भ्रमनिरास झालेला, हरलेला, आजवर जपलेल्या आदर्शापासून पळू पाहणारा, विरक्तीला वासनेचा ताजा कलम जोडू पाहणारा परंतु तरीही गांधीबाबाने पछाडले असल्याने सत्यासारख्या काही मूल्यांमागे धावणारा हतभागी स्वातंत्र्यसनिक हा त्या पराभूत पांढरपेशांचा प्रतिनिधी आहे. या टोपीखाली आणि मुकुटाखाली नेमके काय दडले आहे हा त्याला सतत छळणारा प्रश्न होता. सामनात िहदुरावची अवघी सामाजिक आणि अर्थसत्ता मास्तरच्या बुद्धीपुढे हरते. त्याला बेडय़ा पडतात आणि चित्रपट संपतो. हे आदर्शवत् होते, गोड होते, परंतु ते वास्तवाला धरून होते की काय याबद्दल मात्र शंका आहे. खरे तर ते स्वप्नरंजनच. याचे कारण िहदुराव धोंडे-पाटील तसे हरत नसतात. कारण िहदुराव ही व्यक्ती नसते. ती व्यवस्था असते. महाराष्ट्राच्या पुढील राजकीय वाटचालीने हेच अधोरेखित केले आहे.
राज्याच्या राजकारणातील काँग्रेसची सद्दी आज कमी झाली आहे. सहकाराचे तीनतेरा वाजले आहेत. ज्यांच्या बापजाद्यांनी ही चळवळ उभारली तेच आज तिचे खांदेकरी झाले आहेत. एकीकडे आपले सहकारी साखर कारखाने अवसायनात काढायचे आणि दुसरीकडे आपणच ते विकत घेऊन फायद्यात चालवायचे, असा एक नवा खेळ या नवसामंतांनी सुरू केला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील जनतेचेही सहकारावरील अवलंबित्व कमी होत असून, तेथील अर्थव्यवस्थेला नवे धुमारे फुटत आहेत. एके काळी शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळख असलेला भारतीय जनता पक्ष या बदलांवर मांड ठोकून आज काँग्रेसी व्यवस्थेला आव्हान देत आहे. अशा परिस्थितीत येथील तमाम िहदुराव एक तर नामशेष व्हायला हवे होते किंवा आत तरी जायला हवे होते. परंतु तसे घडलेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पोसलेल्या सुभेदारी पद्धतीमुळे येथील पक्ष संघटना कमकुवत झाल्या. याचा निर्लज्ज लाभ भाजप घेत असून एके काळचे काँग्रेसी िहदुराव आज गळ्यात भगवे उपरणे गुंडाळून फिरत आहेत. याचा अर्थ ग्रामीण भागातील राजकीय व्यवस्थेचा केवळ वाण बदलला. गुण तोच राहिला. या व्यवस्थेत मास्तर मात्र हरवला. मास्तरमध्ये व्यवस्थेला थेट भिडून प्रश्न विचारण्याचे सामथ्र्य होते. सामनामध्ये िहदुराव आपल्या सत्तेला आव्हान देऊ पाहणाऱ्या मारुती कांबळे या दलित अपंग सनिकाचा काटा काढतो. त्या मारुती कांबळेचे काय झाले हा मास्तरचा प्रश्न आहे. आजही तोच सवाल कायम आहे. सत्तेला आव्हान देणाऱ्या तमाम मारुती कांबळ्यांचे काय झाले? त्यांच्या आरटीआय अर्जाचे काय झाले?
म्हणूनच चाळिशीतला हा सामना आजही सुसंगत आहे. पण म्हणून आज कोणी तो पुन्हा काढायला जाऊ नये. राजकीय व्यवस्थेचे पापुद्रे काढणारे चित्रपट काढण्याची आपणास सवय नाही. तरीही तो कोणी पुन्हा काढू गेले तर मात्र त्यातील मास्तर हे पात्र कुठून आणणार हाच प्रश्न पडेल. आणि आणले तरी ते हा सामना जिंकतीलच याची मात्र हमी नाही. कारण हा सामनाच मुळी कॉर्पोरेट िहदुरावांनी आखलेला असेल.



साभार लोकसत्ता 

No comments:

Post a Comment