BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

Saturday, August 1, 2015

विज्ञानेश्वराचे प्रस्थान

कोळ्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम या पोरास वैमानिक व्हावयाचे होते. तशी संधी आली असता ती त्यास नाकारली गेली. हवाई दलाचे वैमानिक होण्यासाठी ते अपात्र ठरले. ते योग्यच झाले. कारण विमानास पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बंध तोडण्याचा अधिकार नसतो. कितीही शक्तिशाली असले तरी विमान पृथ्वीच्या वातावरणाच्या मर्यादा सोडत नाही. एखादा काँकार्ड विमानाचा अपवाद. अन्यथा विमान आपल्या अंगभूत मर्यादेतच घुटमळत राहते. एपीजे कलाम यांच्या आकांक्षेस ती मर्यादा मानवली नसती. त्यांना अवकाश खुणावत होते. साध्या समूहगानास अपात्र ठरलेल्या एखाद्या गायकाने पुढे स्वत:ची एकल बठक भरवण्याइतकी गाण्यात प्रगती करावी, तसे हे झाले. आकाशयानासाठी अपात्र ठरलेले एपीजे पुढे इतके वाढले की ते आकाशाच्या सीमा ओलांडून अवकाशाकडे झेपावले. कलाम यांचे उड्डाणप्रेम इतके तीव्र की वैमानिक म्हणून नाकारले गेल्यानंतर त्यांनी या क्षेत्राशी संबंध राहावा म्हणून िहदुस्थान एअरोनॉटिक्समध्ये कनिष्ठ पदाची नोकरी पत्करली. रामेश्वरसारख्या दूरस्थ खेडय़ात जन्मलेला, साध्या शालेय शिक्षणासाठीदेखील वर्तमानपत्र टाकण्याचे काम करून अर्थार्जन करावे लागलेला एक गरीब मुलगा देशाचा राष्ट्रपती आणि अवकाश क्षेत्राचा चेहरा बनून जातो, ही कहाणीच विलक्षण प्रेरणादायी आहे. कलाम यांच्याभोवती जी काही प्रभावळ तयार झाली ती या पाश्र्वभूमीमुळे. ज्या समाजात प्रचंड मोठय़ा घटकास वंचित राहावे लागते, ज्या समाजात प्रगतीच्या संधीचा सुग्रास घास मूठभरांच्याच ताटात सहज पडतो त्या समाजात रामेश्वरात मुसलमान कुटुंबात जन्माला येऊन धर्म, जात, प्रांत, भाषा अशी सर्व बंधने ओलांडून अवकाशाकडे झेपावणारे कलाम आदर्श आणि अनुकरणीय ठरतात यात नवल नाही.क्रायोजेनिक इंजिनांच्या साहाय्याने मोठे उपग्रह अवकाशात सोडण्याचे क्षेत्र असो की अणुस्फोट चाचणी, डॉ. अब्दुल कलाम यांचा त्यात मोठा वाटा होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक मानसन्मान मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती बनले. तेथेही त्यांच्या कार्यामुळे त्या पदाची उंची वाढली. कलाम असे उंचच राहिले. या उंचीचा त्यांना ध्यास होता. ते त्यांचे प्रेयस होते आणि आपल्या जगण्याने त्यांनी ते श्रेयसही केले.
वास्तविक कलाम यांच्या आधी अवकाश वा तत्संबंधी क्षेत्रात भारतात काही घडत नव्हते असे नाही. विक्रम साराभाई, त्यांचे पूर्वसुरी होमी भाभा आदींनी विज्ञानक्षेत्राची मजबूत पायाउभारणी आपल्याकडे केली होतीच. या धुरंधरांना पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या द्रष्टय़ाचे नेतृत्व लाभल्याने त्या काळातील प्रगती खरोखरच वाखाणण्याजोगी होती. परंतु तरीही या सर्व महानुभावांना कलाम यांच्यासारखी लोकप्रियता मिळाली नाही. ते सर्वच आदरणीय होते. पण त्यांच्याविषयीचा आदर दडपणाच्या कोंदणातून यायचा. कलाम यांचे तसे नाही. त्यांची तुलनाच करावयाची झाल्यास ती महात्मा गांधी यांच्या राजकीय नेतृत्वाशी करावी लागेल. महात्मा गांधी यांच्या आधीही लोकप्रिय राजकारणी होते. परंतु एक बाळ गंगाधर टिळक यांचा अपवाद वगळता ते जनसामान्यांना आपलेसे वाटत नसत. महात्मा गांधी यांनी रस्त्यावरच्या जनसामान्यांच्या देशप्रेमासही किंमत दिली. देशासाठी आपणही काही करू शकतो असे सामान्यांतल्या सामान्यास वाटू लागणे हे महात्मा गांधी यांचे यश. विज्ञान क्षेत्राच्याबाबत हे पुण्य कलाम यांच्या खाती जमा होते. आपणास जे साध्य करावयाचे आहे ते होईपर्यंत प्रयत्न करीत राहणे हे त्यांचे वैशिष्टय़. अशा प्रयत्नांवर निष्ठा असणाऱ्यांना फार दूरचे दिसते. कलामांना तसे दिसत असे. त्यामुळे अमेरिका आदी बडय़ा देशांनी भारतावर र्निबध घातले तरी भारतीय तंत्रज्ञ त्यातून मार्ग काढू शकतात, हा विश्वास त्यांना होता आणि स्वत:चाच विश्वास सार्थ ठरवून दाखवण्याची धमक त्यांच्यात होती. बडय़ा देशांनी १९७४ साली अणुचाचण्या केल्या म्हणून भारतास युरेनियमपुरवठा बंद करण्याची शिक्षा दिली. त्यानंतरही न डगमगता भारतात.. त्यातही रामेश्वरच्या किनारपट्टी परिसरात.. प्रचंड प्रमाणावर आढळणाऱ्या थोरियमचा वापर करून युरेनियम तयार करता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखवण्याचे महान कार्य ज्या तंत्रज्ञांनी करून दाखवले त्यात कलाम यांचा अंतर्भाव होतो. सामान्य नागरिकास कदाचित याचे महत्त्व कळणार नाही. परंतु थोरियमचे हे गुणदर्शन भारतासाठी अत्यंत दूरगामी महत्त्वाचे आहे, हे नि:संशय. याच काळात भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात मोठय़ा घडामोडी घडत होत्या. क्रायोजेनिक इंजिनांच्या साहाय्याने मोठे उपग्रह कसे अवकाशात सोडता येतील, यासाठी बरेच संशोधन सुरू होते. कलाम यांचा त्यात मोठा वाटा आहे. आज या क्षेत्रात पाच बडय़ा देशांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची योग्यता ज्या देशांनी मिळवली त्यात भारतासारख्या दरिद्री देशाचा समावेश होतो. हे यश कलाम, डॉ. अनिल काकोडकर अशा तंत्रज्ञांचे. त्या अर्थाने कलाम हे उच्च दर्जाचे अभियंते होते. आपल्याकडे विज्ञानक्षेत्राशी संबंधित सर्वानाच वैज्ञानिक म्हटले जाते. कलाम हे तसे वैज्ञानिक नव्हते. हे काही त्यांच्यातील न्यून नाही. खुद्द कलाम यांना आपल्यातील या तंत्रज्ञाची जाणीव होती. तरीही एखादा वैज्ञानिकही करू शकणार नाही, असे एक मोठे काम त्यांच्या हातून घडले.
ते म्हणजे विज्ञान प्रसाराचे. कलाम मूíतमंत विज्ञानवादी, प्रयत्नवादी होते. ही बाब आपल्यासारख्या दांभिक समाजात अत्यंत महत्त्वाची. याचे कारण विज्ञान आणि धर्मातील कर्मकांड या दोन्ही डगरींवर तोल सांभाळत जगणाऱ्यांची संख्याच आपल्या समाजात जास्त. ही कसरत कलाम यांनी कधीही केली नाही. जाणीवपूर्वक. देशातील सर्वोच्च पदावर निवड झाल्यावर त्यांनी राष्ट्रपती भवनात निवास करणे क्रमप्राप्त होते. तेव्हा कोणत्या मुहूर्तावर आपण राष्ट्रपती भवनात राहावयास येणार असे सरकारने विचारले असता, कलाम यांनी उत्तर दिले.. प्रत्येक दिवस माझ्यासाठी सुमुहूर्त असतो. आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. कलाम त्याप्रमाणेच वागले. भूमिका अशी घ्यावयाची आणि चोरून मुहूर्त पाहावयाचा असली लबाडी करण्याची वेळ त्यांच्यावर कधीही आली नाही. विचार आणि वागणे यांच्याशी त्यांचा थेट संबंध होता. त्यामुळे वेगवेगळ्या श्रेयांसाठी ओळखले जात असतानाही आपल्याला विज्ञानवादी शिक्षक ही ओळख सर्वात प्रिय आहे, असे कलाम म्हणत. विज्ञानाची विविध गुह्य़े जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे त्यांना मनापासून आवडे. ते हे काम न कंटाळता करीत. अणुऊर्जा आयोगाशी संबंधित असताना मुंबईत त्यांचे वारंवार येणे असे. त्या वेळी कलाम यांच्याशी अनेकदा संवाद झाला. विज्ञानविषयक वार्ताकन करणारे वार्ताहर त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत. परंतु त्यातील एकाही प्रश्नाला वा प्रश्नकर्त्यांला कलाम यांनी कमी लेखले असे झाल्याचे एकही उदाहरण नाही. काही काही विषयांवर भाष्य करण्यात त्यांना अंगभूत मर्यादा येत. ते कलाम पाळत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने कधीही वाद वगरे झाले नाहीत.
हे त्यांचे स्वभाववैशिष्टय़ होते. त्यांच्या हयातीत के. संथानम, होमी सेठना आदींनी कलाम यांच्यावर थेट टीका केली आणि त्यांच्या क्षमतेसंदर्भात काही प्रश्नही उपस्थित केले. त्यास उत्तर देण्याच्या फंदात कलाम कधी पडले नाहीत. खरे तर अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कालखंडात कलाम भारतीय अणुऊर्जा क्षेत्राच्या केंद्रस्थानी होते. अमेरिका ते सोविएत रशिया या टापूत बरेच काही घडत होते आणि बऱ्याचदा भारतही त्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होता. परंतु यातील कशाचीही वाच्यता कलाम यांच्या आत्मचरित्रात नाही. एका अर्थाने ही त्यांची मर्यादादेखील ठरते. पण अशा मर्यादेची एक बाजू चांगुलपणाची असते. कलाम यांच्या राष्ट्रपती भवनातील वास्तव्यात ती दिसून आली. २००४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस बहुमताच्या जवळ गेल्यावर पंतप्रधानपदी सोनिया गांधी यांची निवड होणार हे स्पष्ट होते. परंतु तसे झाले नाही. गांधी यांनी ऐन वेळी माघार घेतली. त्या वेळी त्यांचे परदेशी मूळ लक्षात घेऊन राष्ट्रपती कलाम यांनी त्यांना पंतप्रधानपद न स्वीकारण्याची मसलत दिली, असे बोलले गेले. कलाम यांनी त्या विषयी कधीही ब्रदेखील काढला नाही. राष्ट्रपती म्हणून मुदत संपल्यावर त्यांना आणखी एक संधी दिली जाणार होती. ती खुद्द कलाम यांनी अव्हेरली. पद नाकारणारे भारतासारख्या देशात दुर्लभच ठरतात आणि तसे कोणी आढळल्यास भाबडी जनता अशा व्यक्तीस आनंदाने ऋषिपद बहाल करते. कलाम यांना ते तसे मिळाले. त्यांचा मोठेपणा हा की या ऋषिपदास तडा जाईल अशी एकही कृती कलाम यांच्या हातून घडली नाही. त्यात जोडीला असलेला अंगभूत साधेपणा. भारतात लोकप्रियतेच्या शिखराचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळण्यासाठी या बाबी पुरेशा ठरतात. अशा व्यक्तींना पदासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, पदच त्यांचा शोध घेत येते. कलाम यांचे तसे झाले. त्यामुळे पीसी अलेक्झांडर यांच्या ऐवजी राष्ट्रपतिपदाचे सर्वसंमत उमेदवार म्हणून कलाम यांची निवड झाली. अलेक्झांडर हे एके काळी काँग्रेसला जवळचे. दिवंगत इंदिरा गांधी यांचे विश्वासू. तेव्हा त्यांच्या नावास काँग्रेस आक्षेप घेणार नाही, हा अटलबिहारी वाजपेयी सरकारातील प्रमोद महाजन यांचा होरा. तो चुकला. कारण सोनिया गांधी यांनी अलेक्झांडर यांना पािठबा नाकारला. त्यानंतर कलाम यांचे नाव पुढे केले गेले. ते मान्य झाले. त्यांना राष्ट्रपतिपदासाठी उभे करण्यात खरे तर एक राजकारण होते. परंतु या राजकारणाचा गंध राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यावर दूरान्वयानेही कलाम यांच्या वागण्यास आला नाही. ते होते तसेच राहिले. उलट त्यांच्यामुळे त्या पदाची उंची वाढली.
कलाम हे असे उंचच राहिले. या उंचीचा, अनंत उंचीचा त्यांना ध्यास होता. ते त्यांचे प्रेयस होते आणि आपल्या जगण्याने त्यांनी ते श्रेयसही केले. ते विविधांगी जगले. या सर्व अवतारांत एक सूत्र समान होते. ते म्हणजे विज्ञानप्रेम. ते कधीही आटले नाही. त्या प्रेमाचाच आविष्कार होता विद्यार्थाशी गप्पा. या अशा गप्पांतच त्यांच्या आयुष्याची इतिश्री व्हावी हा एक विलक्षण योगायोग. तो आणखी एका कारणाने उठून दिसतो. भद्र-अभद्र, शुभ-अशुभ वगरे काहीही न मानणाऱ्या कलाम यांचे सोमवारी निधन झाले. श्रद्धाळू, धर्म-अधर्माच्या गत्रेत अडकलेला जनसमुदाय आषाढी एकादशी पाळून आपल्या खात्यात काही पुण्य जमा व्हावे यासाठी मग्न असताना या विज्ञानेश्वराने अनंताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली.
साभार लोक्सत्ता 

No comments:

Post a Comment